मिरा-भाईंदरमध्ये पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीला मराठी एकीकरण समितीचा विरोध
मिरा-भाईंदरमध्ये पर्युषण पर्वातील मांसविक्री बंदीला मराठी एकीकरण समितीचा विरोध
स्थानिक मासेविक्रेत्यांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित; पालिका आयुक्तांकडे बंदी मागे घेण्याची मागणी
मिरा-भाईंदर : जैन धर्मीयांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने ८ आणि १५ सप्टेंबर रोजी मांस व मासे विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध दर्शविला असून, समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन बंदीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली.
जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व ८ ते १६ सप्टेंबरदरम्यान साजरे होत आहे. या कालावधीतील पहिला आणि शेवटचा दिवस, म्हणजे ८ आणि १५ सप्टेंबर रोजी मांस व मासे विक्रीची दुकाने तसेच संबंधित प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या निर्णयाला विरोध करताना गोवर्धन देशमुख यांनी हा निर्णय ‘तुघलकी’ असल्याची टीका केली. धार्मिक सणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या अशा निर्णयाचा स्थानिक आगरी-कोळी समाजातील मासेविक्रेत्या महिलांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
आठ दिवसांच्या मागणीऐवजी दोन दिवसांची बंदी
पर्युषण पर्वाच्या निमित्ताने भाजपच्या काही नगरसेवकांनी सुरुवातीला आठ दिवस मांस-मासे विक्री बंद ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने सध्या दोन दिवसांची बंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीने स्थानिक विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘धार्मिक भावना जपा; मात्र इतरांवर बंधन नको’
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात समितीने रोजगार, खाद्यस्वातंत्र्य आणि सामाजिक सलोखा या मुद्द्यांवर भूमिका मांडली. धार्मिक श्रद्धांचा आदर केला पाहिजे; मात्र एखाद्या धर्माची आचारसंहिता इतर नागरिकांवर लादली जाऊ नये, असे समितीने म्हटले आहे.
‘शहरात संघर्ष, दंगे किंवा सामाजिक तेढ वाढवू नका. धर्म स्वतः पाळावा, पण तो इतरांवर लादू नये,’ असे आवाहन देशमुख यांनी केले.
लोकप्रतिनिधींनी कोणताही निर्णय घेताना नागरिकांच्या रोजगाराचा आणि दैनंदिन जीवनाचा विचार करावा, अशी मागणीही समितीने केली. ‘आपण इंग्रज नाही, तर जनतेचे सेवक आहात,’ अशा शब्दांत देशमुख यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर टीका केली.
तर्कशुद्धतेवरही प्रश्नचिन्ह
मांस-मासे विक्रीबंदीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करताना देशमुख यांनी विविध उदाहरणे देत निर्णयाच्या तर्कशुद्धतेवरही आक्षेप घेतला. ‘मी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी विक्री बंद करावी, हे योग्य नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच, वैयक्तिक श्रद्धा आणि आचार इतरांवर लादण्याच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
महापालिकेच्या ठरावांच्या अधिकाराचा वापर करताना बहुमताच्या जोरावर नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारे निर्णय घेऊ नयेत, असा इशाराही समितीने दिला आहे.
दरम्यान, पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर ८ आणि १५ सप्टेंबर रोजी मांस व मासे विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापालिका प्रशासन ठाम आहे. दुसरीकडे, ही बंदी रद्द करून खाद्यस्वातंत्र्याबरोबरच स्थानिक मासेविक्रेत्यांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.