२९ सप्टेंबरला देवरुख येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’
२९ सप्टेंबरला देवरुख येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’
रत्नागिरीतील युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी; इच्छुक उमेदवार व उद्योजकांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
देवरुख :
रत्नागिरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हा रोजगार मेळावा सकाळी १० वाजता कॉलेज ऑफ फिट अँड डिझाइन (D CAD), भागवत संकुल, मधली आळी, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे होणार आहे.
रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाला अनुरूप रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठी ऑनलाइन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच विविध कंपन्या, नियोजक आणि आस्थापनांनी आपल्या आस्थापनेतील रिक्त पदांसाठी आवश्यक पात्र मनुष्यबळाची निवड करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करून रिक्त पदांची माहिती सादर करावी, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती तसेच उद्योजकांनी या रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.