गणेशोत्सवात नेटवर्क समस्यांसाठी BSNLची विशेष हेल्पलाईन
गणेशोत्सवात नेटवर्क समस्यांसाठी BSNLची विशेष हेल्पलाईन
सिंधुदुर्गातील नागरिकांना नेटवर्क, कव्हरेज, कॉल ड्रॉप व इंटरनेटसंबंधी तक्रारी नोंदविता येणार
सिंधुदुर्ग :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बीएसएनएल मोबाईल नेटवर्कशी संबंधित समस्या तातडीने सोडविण्यासाठी बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्गात चाकरमानी, भाविक, नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने मोबाईल नेटवर्कवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांत नेटवर्क व कव्हरेजची समस्या, कॉल ड्रॉप तसेच इंटरनेटचा वेग कमी होणे यांसारख्या अडचणी उद्भवू शकतात.
नागरिकांना अशा समस्या थेट बीएसएनएलच्या निदर्शनास आणून देता याव्यात, यासाठी ०२३६३-२७१००६ हा विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यातील नागरिक व बाहेरून येणाऱ्या भाविकांना मोबाईल सेवा सुरळीत मिळावी, यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाने ही विशेष हेल्पलाईन सुरू केली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी नेटवर्क, कव्हरेज किंवा दूरसंचार सेवेसंदर्भातील अडचणी असल्यास ०२३६३-२७१००६ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन बीएसएनएल सावंतवाडी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.