ध्वनी प्रदूषणाला आळा घाला, रस्ते मोकळे ठेवा; POP मूर्तींवरही कारवाई करा
-सकल हिंदू परिवाराचे दापोली पोलिसांना निवेदन
दापोलीत ध्वनी प्रदूषण, POP मूर्तींवर कारवाईची मागणी; सकल हिंदू परिवाराचे पोलिसांना निवेदन
डेसिबल मीटरचा प्रभावी वापर करण्याची मागणी
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध धार्मिक व सामाजिक उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाला आळा घालावा, रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग व मंडपांमुळे होणारे वाहतुकीचे अडथळे दूर करावेत आणि POP मूर्तींच्या उत्पादन-विक्री-विसर्जनावर प्रभावी कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सकल हिंदू परिवार, दापोलीच्या वतीने दापोली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
पोलीस निरीक्षकांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव यांनी हे निवेदन स्वीकारले.
निवेदनात उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सायलेन्स झोनमध्ये लाऊडस्पीकर, DJ व डॉल्बीच्या वापरावर निर्बंध ठेवावेत तसेच निवासी व सायलेन्स झोनसाठी निर्धारित ध्वनी मर्यादेचे पालन होत आहे की नाही, यासाठी पोलीस ठाण्यांमधील डेसिबल मीटरचा प्रभावी वापर करून ध्वनीची मोजणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच रात्रीच्या वेळेत ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. शासनाने उत्सवांसाठी दिलेल्या सवलतींच्या काळातही रात्री १२ नंतर ध्वनी प्रदूषणाबाबतची मर्यादा कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्ते अडवून उत्सव नको!
उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक रस्ते, फूटपाथ किंवा वाहतुकीचे मार्ग अडविले जाऊ नयेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. मंडळांनी रस्त्यावर अनधिकृत बॅरिकेड्स, मंडपाचे खांब किंवा पार्किंग करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये. गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुका वाहतुकीला अडथळा न आणता आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पार पडाव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
POP मूर्तींच्या विक्री-विसर्जनावर कारवाईची मागणी
POP मूर्तींच्या उत्पादन, विक्री आणि नैसर्गिक पाण्यातील विसर्जनासंदर्भातील शासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बाहेरील भागातून दापोली तालुक्यात येणाऱ्या POP मूर्तींची चेक नाक्यांवर तपासणी करून त्यांना रोखावे, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, दापोली तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन ध्वनी प्रदूषण, वाहतूक व्यवस्था आणि POP मूर्तींबाबतचे शासन निर्णय व न्यायालयीन आदेश यांची स्पष्ट माहिती द्यावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषण नियम व मोटार वाहन कायद्यानुसार तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.
उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच नागरिकांची शांतता, सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.