२० दिवसांत २९० मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा
ठाणे :
केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFS) ॲपद्वारे ठाणे जिल्ह्यात २७ ऑगस्ट २०२६ पासून खत विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताचे ऑनलाइन बुकिंग करता येत असून, बुकिंगनंतर मिळणाऱ्या QR कोडच्या माध्यमातून संबंधित कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करता येत आहे.
FFS प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाचण्यास मदत होत असून खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता निर्माण झाली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अवघ्या २० दिवसांत ठाणे जिल्ह्यात २९० मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात FFS प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. निविष्ठा विक्रेते तसेच क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामसभा आणि ग्रामस्तरीय कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्येही जनजागृती केली जात आहे.
FFS ॲपवरून खत बुकिंग कसे कराल?
शेतकऱ्यांनी Google Play Store वरून FFS ॲप डाउनलोड करून Agri Stack ID किंवा आधारच्या माध्यमातून नोंदणी करावी. त्यानंतर जमीन व पिकांची माहिती तपासून आवश्यक खताची निवड करून बुकिंग करावे. सोयीचा निविष्ठा विक्रेता निवडल्यानंतर मिळालेला QR कोड दाखवून कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करता येईल. हा QR कोड तीन दिवसांसाठी वैध राहणार आहे.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी FFS ॲपचा जास्तीत जास्त वापर करून आवश्यकतेनुसार खताचे ऑनलाइन बुकिंग व खरेदी करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.