बचत गटांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा
बचत गटांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा
उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांचे आवाहन; प्रति सदस्य ४० हजार, गटाला कमाल ४ लाखांचे खेळते भांडवल
कोल्हापूर :
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही बचत गटांसाठी आर्थिक विकासाची महत्त्वपूर्ण संधी आहे. बचत गटांनी या योजनेचा लाभ घेऊन अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करावेत आणि आर्थिक विकास साधावा, असे आवाहन कोल्हापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केले.
वडणगे येथील हनुमान तरुण मंडळ येथे आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. PMFME योजनेअंतर्गत प्रति सदस्य ४० हजार रुपये, तर प्रति स्वयंसहायता गटाला कमाल ४ लाख रुपये खेळते भांडवल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे बचत गटांनी या योजनेची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक कृषी अधिकारी माधुरी पाटील यांनी शेतकऱ्यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन केले. तसेच गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने १६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा आहे.
या कार्यक्रमाला योगेश भगत, बाबासाहेब जवंदाळ, श्रीधर काटे, महादेव पाटील, पंकज मिरजे, प्रकाश कदम, कुंडलिक पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.