आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, कसबा आचरे रामेश्वर मंदिर येथे श्री गणेशमूर्तीची स्थापना दिमाखात करण्यात आली आहे. यंदाचा गणेशोत्सव तब्बल ४१ दिवस साजरा होणार असून, या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मांदियाळी रंगणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त कीर्तन, आमने-सामने डबलबारी भजन, दशावतार नाट्यप्रयोग, फुगडी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, संगीत मैफिली तसेच दर्जेदार ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंडळांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रदीप प्रभू मिराशी आणि सचिव संतोष मिराशी यांनी केले आहे.
शनिवार २६ सप्टेंबर रोजी रात्री श्री ब्राह्मणदेव मिराशीवाडी व महापुरुष मित्रमंडळ वरचीवाडी पुरस्कृत संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवार २९ सप्टेंबर रोजी श्री भवानी डंपर सर्विस, श्री. मनोज प्रकाश हडकर पुरस्कृत श्री दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्ग यांचा दशावतार नाट्यप्रयोग होईल.
१ ऑक्टोबर रोजी ईश्वटी महापुरुष मंडळ जामडूल पुरस्कृत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, कवठी-चेंदवण यांचा प्रयोग, तर ३ ऑक्टोबर रोजी श्री ब्राह्मणदेव गाऊडवाडी मित्रमंडळ पुरस्कृत हेरंभ दशावतार सिंधुदुर्ग यांचा दशावतार नाट्यप्रयोग रंगणार आहे.
४ ऑक्टोबर रोजी डोंगरेवाडी पुरस्कृत आमने-सामने महिला डबलबारी भजनाचा सामना, तर ५ ऑक्टोबर रोजी शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स बाणे पुरस्कृत लोकराजा श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.
६ ऑक्टोबर रोजी हिर्लेवाडी विकास मंडळ पुरस्कृत ‘स्वरधारा’ संगीत गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले असून, गायक विनय वझे (आचरा) व सहकारी सहभागी होणार आहेत. ७ ऑक्टोबर रोजी सत्यवान परब पुरस्कृत गुरुकृपा दशावतार कला नाट्य मंडळ, हळवळ यांचा दशावतार नाट्यप्रयोग होईल.
१० ऑक्टोबर रोजी राजन पुजारे मित्रमंडळ प्रायोजित खुली समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांचे प्रायोजकत्व असून संपर्कासाठी श्री. बाबू कदम (९४२१५७४७००) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
११ ऑक्टोबर रोजी समर्थनगर वरचीवाडी पुरस्कृत खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी पुरस्कृत कार्यक्रम, तर १३ ऑक्टोबर रोजी चावल मुजावर प्रायोजित खुली जोडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
१५ ऑक्टोबर रोजी व्यापारी संघटना आचरा आणि वैभवशाली पतसंस्था मर्यादित, आचरा पुरस्कृत सुश्राव्य कीर्तन होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी वाडोळी ग्रामस्थ मंडळ आचरा-भंडारवाडी पुरस्कृत लोकराजा ट्रिकसीन ग्रुप, नेरूर यांचा ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ ट्रिकसीनयुक्त दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी श्री गजानन उर्फ गजू गावकर पुरस्कृत खुली एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे.
गुरुवार २२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री सत्यनारायण महापूजा होणार असून, यानिमित्त आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. यात बुवा श्री. संदिप पुजारे (महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण, देवगड), पखवाज – कु. संकेत राऊत, यांचा सामना बुवा गौरव पांचाळ (भजन मंडळ, फुणगूस-कडेवठार, संगमेश्वर), पखवाज – वैभव पांचाळ यांच्यात होणार आहे.
२३ ऑक्टोबर रोजी देऊळवाडी मित्रमंडळ पुरस्कृत मंगळागौर भव्य खुली महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर शनिवार २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रामेश्वर मंदिर ते आचरा समुद्रकिनारा अशी मिरवणूक काढून श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे.
आचरा रामेश्वर संस्थानच्या या दीर्घकालीन गणेशोत्सवात धार्मिक श्रद्धेसोबतच कोकणच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे परिसरातील भाविक, रसिक आणि नागरिकांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.