श्री. प्रवीण शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कोंढे गाव मर्यादित गणपती मखर सजावट स्पर्धेला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २६ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत कल्पकता, कलात्मकता तसेच कोकणच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक मखरांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेत इंदुलकर परिवाराच्या गणरायाने प्रथम क्रमांक पटकावला. काते परिवाराच्या गणरायाने द्वितीय, तर बोबले परिवाराच्या गणरायाने तृतीय क्रमांक मिळविला.
इंदुलकर परिवाराने मखर सजावटीतून ग्रामीण संस्कृतीचे सुंदर आणि कलात्मक दर्शन घडविले. काते परिवाराने कोकणच्या पारंपरिक जीवनाशी नाते सांगणारी बैलगाडीची जोडी आणि त्यावर विराजमान गणरायाची आकर्षक संकल्पना साकारली. तर बोबले परिवाराने ग्रामीण घराची संकल्पना मखरातून प्रभावीपणे मांडत पारंपरिक कोकणी जीवनशैलीचे दर्शन घडविले.
स्पर्धेचे परीक्षण अरविंद मांडवकर यांनी केले. विजेत्यांना अनुक्रमे डिनर सेट, टेबल फॅन आणि कुकर अशी पारितोषिके देण्यात आली. ही पारितोषिके शुभ्र मोबाईल, दापोली-पुणे, विनेश विजय पाटील आणि विशाल विजय पाटील यांच्या सहकार्याने देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या गणेशभक्तांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रभाकर शिंदे व विश्वनाथ दळवी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ प्रोत्साहनपर भेटवस्तू दिल्या.
दि. १७ रोजी अनुराग संतोष घोडेराव यांच्या निवासस्थानी बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी कोंढे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, प्रवीण शिंदे मित्र मंडळाचे प्रवीण शिंदे, माजी सरपंच राजाराम घोडेराव, माजी सरपंच विजय शिगवण, कोंढे शाखाप्रमुख जयवंत राजीवले, मुंबईचे कार्यकर्ते संदेश गोरिवले, कृष्णा भुवड, दत्ताराम गोरिवले, डॉ. विनोद घोडेराव, विनोद दळवी, बाळा कदम, अमोल घोडेराव, प्रशांत पाते, महेंद्र रहाटे, प्रभाकर कदम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, स्पर्धक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गणपती मखर सजावट स्पर्धेच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासोबतच ग्रामीण कला, कोकणी संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैली जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला.
फोटो : गणपती मखर सजावट स्पर्धेतील स्पर्धक व मान्यवर. छाया : अविनाश दळवी