महाराष्ट्र FDAची मोठी कारवाई; सुलेमान उस्मान मिठाईवाल्यासह १० आस्थापनांचे परवाने निलंबित
महाराष्ट्र FDAची मोठी कारवाई; सुलेमान उस्मान मिठाईवाल्यासह १० आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई :
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली. १७ ते २० सप्टेंबरदरम्यान झालेल्या या मोहिमेत मुंबईतील प्रसिद्ध सुलेमान उस्मान मिठाईवाला यांच्यासह एकूण १० खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
FDAच्या अधिकृत माहितीनुसार, सुलेमान उस्मान मिठाईवाला यांच्या आस्थापनेच्या अन्नपदार्थ तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या ठिकाणी तपासणीदरम्यान काही स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले. तयारी व साठवणूक क्षेत्राचे गटार, मलनिःसारण वाहिन्या तसेच कचरा साठवण्याच्या ठिकाणांपासून आवश्यक ते विलगीकरण नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरात अंदाजे ३२,०२३ किलो/लिटर अन्नसाठ्यावर कारवाई करण्यात आली. जप्त किंवा नष्ट करण्यात आलेल्या या अन्नसाठ्याची किंमत सुमारे १.३६ कोटी रुपये असल्याचे FDAने सांगितले.
या आस्थापनांचे परवाने निलंबित
१. सुलेमान उस्मान मिठाईवाला, मोहम्मद अली रोड
२. स्विगी इन्स्टामार्ट डार्क स्टोअर (स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड), बलार्ड इस्टेट
३. सद्गुरू स्वीट्स अँड फरसाण मार्ट, मालाड पूर्व
४. अॅक्युलॉजिक्स सप्लाय चेन सोल्युशन्स प्रा. लि. (ॲमेझॉन वेअरहाऊस), कांदिवली
५. नाईस एंटरप्रायझेस, चेंबूर
६. जैन स्वीट अँड भेळपुरी हाऊस एलएलपी, कांदिवली पश्चिम
याशिवाय गो ग्रीन फूड हॉस्पिटॅलिटी (घाटकोपर पूर्व), स्वाद स्नॅक्स कॉर्नर (लालबाग-परळ), लखनवी कबाब (वर्सोवा) आणि झायका मोरादाबादी हॉटेल (वर्सोवा) या खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अशा तपासण्या आणि कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.