महाराष्ट्रात १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; १५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेत
महाराष्ट्रात १,७५६ नवीन १०८ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार; १५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेत
मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत नवीन १,७५६ रुग्णवाहिका शासकीय सेवेत दाखल होणार असून, त्यातील १५० रुग्णवाहिका लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवीन १०८ रुग्णवाहिकांची पाहणी करून त्या लवकरात लवकर सेवेत दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत सूचना दिल्या.
या ताफ्यात २५५ अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट (ALS) आणि १,२०४ बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) रुग्णवाहिकांचा समावेश आहे. याशिवाय नवजात बालकांसाठी ३६ रुग्णवाहिका, १६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी-बोट रुग्णवाहिका आणि १० समुद्री-बोट रुग्णवाहिकांचा समावेश करण्यात आला आहे.
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज
संपूर्ण भारतीय बनावटीच्या या रुग्णवाहिकांमध्ये आपत्कालीन उपचारांसाठी विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्शन पंप आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली यांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णवाहिकांची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला आणि आवश्यक बदलांच्या सूचना केल्या.
महाराष्ट्राची १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी २४ तास उपलब्ध असलेली सेवा असून, तिच्यासाठी टोल-फ्री १०८ क्रमांक कार्यरत आहे.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.