दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘लालपरी’ची खास धाव
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘लालपरी’ची खास धाव
एसटीच्या ताफ्यात १०० मिडी बसेस दाखल होणार; विद्यार्थ्यांची पायपीट थांबवण्याचा परिवहन मंत्र्यांचा निर्धार
मुंबई :
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबविण्यासाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागातील प्रवाशांसाठी एसटीच्या ताफ्यात १०० मिडी बसेस दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
दुर्गम आदिवासी भागांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती, कमी प्रवासीसंख्या तसेच आर्थिक अडचणींमुळे नियमित बससेवा उपलब्ध करून देताना एसटी महामंडळासमोर आव्हाने निर्माण होतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेता केवळ तोट्याचा विचार न करता आवश्यक त्या मार्गांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी लांब अंतर पायी चालावे लागू नये, यासाठी त्यांच्या गरजेनुसार मिडी बसेसचा वापर करण्यात येणार आहे. या बसेसमुळे मोठ्या बसपेक्षा अरुंद व दुर्गम मार्गांवरही सेवा देणे शक्य होणार आहे.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी वाहतूक सुविधा महत्त्वाची असल्याने संबंधित भागातील गरजेनुसार बसमार्ग निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. “तोट्याची चिंता नाही, आदिवासी विद्यार्थ्यांची पायपीट थांबवणार,” अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.