दुष्काळी परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; चार जिल्ह्यांचा आढावा
दुष्काळी परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; चार जिल्ह्यांचा आढावा
मच्छिमारांना मदतीसाठी बँकांनी मत्स्यव्यवसायाशी संबंधित प्रस्ताव स्वीकारण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांची आढावा बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ‘ट्रिगर-१’ अंतर्गत येणाऱ्या जलस्रोतांची प्रत्यक्ष स्थिती तपासण्याच्या सूचना यापूर्वीही देण्यात आल्या आहेत.
बैठकीत तालुकानिहाय तलाव व जलाशयांची संख्या, त्यापैकी कोरडे पडलेले तलाव, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे पर्जन्यमान तसेच ‘ट्रिगर-१’ अंतर्गत अवर्षण परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम आणि त्यातून मच्छिमारांच्या उपजीविकेवर निर्माण होणाऱ्या अडचणींची माहितीही यावेळी घेण्यात आली.
मच्छिमारांना आधार देण्यासाठी बँकांनी मत्स्यव्यवसायाशी संबंधित कर्ज व इतर प्रस्ताव स्वीकारावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच तलावांमधील गाळ काढण्याची कामे संबंधित विभागांनी समन्वयाने मार्गी लावावीत, असे निर्देश देण्यात आले.
मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे आणि जलसंधारण विभागांनी परस्पर समन्वय ठेवून आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करावीत आणि मच्छिमारांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
बैठकीस मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती यांच्यासह मत्स्यव्यवसाय, पाटबंधारे, जलसंधारण विभागांचे अधिकारी तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.