आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्टील उद्योग क्षेत्रांपैकी एक असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातील स्टील उद्योगांना भेडसावणाऱ्या पायाभूत सुविधा आणि बांधकामविषयक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
रस्त्यांची उंची वाढल्यामुळे अनेक कारखाना परिसर सखल झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात पाणी साचून उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. या समस्येवर उपाय म्हणून विद्यमान जागेवरच नवीन रस्त्याच्या उंचीनुसार कारखाना शेडची उंची वाढविण्यासाठी नियमानुसार बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचना सरनाईक यांनी प्रशासनाला केली.
स्टील उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम करणाऱ्या पायाभूत सुविधांशी संबंधित अडचणींचा आढावा घेत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीस नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा, ठाणे जिल्ह्याच्या उद्योग उपायुक्त सोनाली देवरे तसेच स्टील उद्योजक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.