रायगडची अनोखी परंपरा; अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा घरोघरी विराजमान होतो ‘साखरचौथ गणपती’
रायगडची अनोखी परंपरा; अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा घरोघरी विराजमान होतो ‘साखरचौथ गणपती’
अलिबाग :
कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय आणि भाविकांच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे गणेशोत्सव. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन होते आणि अनंत चतुर्दशीला भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप दिला जातो. मात्र, रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतरही बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पुन्हा अनुभवायला मिळतो. ही आगळीवेगळी परंपरा म्हणजे ‘साखरचौथ गणपती’.
रायगड जिल्ह्यात भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला साखरचौथ गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची पूर्वापार परंपरा आहे. या गणपतीचे दीड दिवसांनी विसर्जन केले जाते. विशेषतः अलिबाग परिसरात या उत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.
पूर्वीच्या काळात गणपतीच्या मूर्ती बनविणारे कारखानदार, कलाकार तसेच गणेशोत्सवाच्या तयारीत व्यस्त असणाऱ्या अनेकांना गणेश चतुर्थीला आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करता येत नसे. काही जण कामानिमित्त बाहेरगावी असल्यानेही गणेशोत्सव साजरा करू शकत नसत. तसेच विविध कारणांमुळे गणेश चतुर्थीला मूर्तीची प्रतिष्ठापना न करू शकलेल्या कुटुंबांसाठी नंतरच्या संकष्टी चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्याची प्रथा सुरू झाली, असे मानले जाते.
साखरचौथच्या दिवशी मोदक तयार करताना गुळाऐवजी साखरेचा वापर करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. गणेश चतुर्थीप्रमाणेच या गणपतीचीही भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते. घराघरांत आरती, नैवेद्य आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदा २९ सप्टेंबर रोजी साखरचौथ गणपती उत्सव साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे याच दिवशी अंगारक चतुर्थी असल्याने या उत्सवाला आणखी धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. गणेशोत्सवाच्या मुख्य पर्वानंतरही रायगडमध्ये गणरायाच्या भक्तीचा हा अनोखा उत्सव सुरू राहतो.