रत्नागिरीत २३ ते २५ ऑक्टोबरला ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’
रत्नागिरीत २३ ते २५ ऑक्टोबरला ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’; ११ अभिजात भाषांच्या तज्ज्ञांची उपस्थिती
रत्नागिरी :
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने मराठी भाषा विभाग आणि मराठी भाषा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी येथे ‘भारतीय अभिजात भाषा परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. देशातील ११ अभिजात भाषांच्या तज्ज्ञांची या परिषदेला उपस्थिती राहणार आहे.
अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेच्या नियोजनासाठी रत्नागिरी येथे पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. परिषदेसाठी येणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांच्या निवास, भोजन, वाहन व्यवस्था तसेच सभागृह व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.
परिषदेच्या निमित्ताने आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. ‘भाषिणी’ यंत्रणेच्या माध्यमातून विविध भारतीय भाषांमधील संवादाचे मजकूर स्वरूपात रूपांतर करून ते प्रदर्शित करण्याची डिजिटल व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध भाषांतील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
या परिषदेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राच्या विविध भागांतील समृद्ध खाद्यसंस्कृतीचाही अनुभव घेता येणार आहे. कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी आणि माणदेशी अशा विविध प्रादेशिक खाद्यपरंपरांचा आस्वाद परिषदेदरम्यान पाहुण्यांना देण्यात येणार आहे.
भारतीय भाषांच्या अभिजात परंपरा, त्यांचा इतिहास, साहित्य आणि सांस्कृतिक योगदान यावर विचारमंथन करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रत्नागिरीत होणाऱ्या या अखिल भारतीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाकडून विविध स्तरांवर तयारी सुरू करण्यात आली आहे.