सायबर गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरी

0
14
सायबर गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरी
सायबर गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरी

सायबर गुन्ह्यात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढणाऱ्याला ५ वर्षे सक्तमजुरी

बनावट फेसबुक खात्याद्वारे अश्लील मेसेज, फोटो-व्हिडिओ पाठवून विनयभंग; ठाणे न्यायालयाचा कठोर निकाल

ठाणे :
सोशल मीडियाचा गैरवापर करून अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विनयभंग व मानसिक छळ करणाऱ्या आरोपीला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी मंगेश ईश्वरदास तांबे (वय २८, रा. उत्तन) याला माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर भादंवि कलम ३५४(अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
सागरी उत्तन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आरोपीने डिसेंबर २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत हा प्रकार केला. त्याने फेसबुकवर ‘विद्या’ या नावाने एका मुलीचे बनावट प्रोफाईल तयार करून फिर्यादी तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. समोरील व्यक्ती मुलगी असल्याचे समजून फिर्यादीने ही विनंती स्वीकारली.
त्यानंतर चॅटिंगदरम्यान आरोपीने हळूहळू अश्लील फोटो पाठवण्यास सुरुवात केली. संशय आल्याने फिर्यादीने व्हिडिओ कॉल केला असता समोरील व्यक्ती मुलगी नसून पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फिर्यादीने आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला.
मात्र, नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्याच नावाने बनावट फेसबुक खाते तयार केले. या खात्याद्वारे त्याने फिर्यादीची चुलत बहीण आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणींना अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना धमकावून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले.
या प्रकाराला कंटाळून फिर्यादीने सागरी उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग, पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

९ साक्षीदार आणि डिजिटल पुरावे ठरले महत्त्वाचे

या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील श्रीमती भामरे-पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने तब्बल ९ महत्त्वाचे साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे आणि न्यायालयात सादर करण्यात आलेली कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयीन कामकाजात सरकारी वकिलांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी मोलाचे सहकार्य केले.

न्यायालयाचा निकाल

माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७-अ अंतर्गत आरोपीला ५ वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच भादंवि कलम ३५४-अ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयाने दंडातून वसूल होणारी रक्कम पीडितांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत.
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना आणि संवाद साधताना विशेष काळजी घेणे किती आवश्यक आहे, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिला व अल्पवयीन मुलींना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायद्याची कठोर कारवाई होऊ शकते, असा संदेशही या निकालातून मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here