मालवणमध्ये बीच लोककला महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ; दशावताराने जिंकली रसिकांची मने
कोकणची लोकसंस्कृती, पारंपरिक कला आणि पर्यटनाला प्रोत्साहन; नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते उद्घाटन
मालवण (प्रतिनिधी) :
कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या दोन दिवसीय बीच लोककला महोत्सवाला मालवण येथे उत्साहात सुरुवात झाली. मालवण बंदर जेटी वाहनतळ येथे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर’ यांच्या दमदार दशावतार नाट्यप्रयोगाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
दशावताराने जिंकली रसिकांची मने
कोकणातील पारंपरिक लोककला आणि संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच पर्यटनाला चालना देणे व स्थानिक कलाकारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच पर्यटकांना कोकणच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देण्याची संधी मिळत आहे.
महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या दशावतार नाट्यप्रयोगात लोक राजा श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत, तीन पिढ्यांचा वारसा लाभलेल्या ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर’ने पौराणिक कथांवर आधारित नाट्य सादर केले. रंगीबेरंगी वेशभूषा, प्रभावी अभिनय आणि दमदार संवादांच्या माध्यमातून कलाकारांनी दशावतार कलेचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडविले. कलाकारांच्या सादरीकरणाला नागरिक आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतारासोबतच लावणी, पोवाडा, लोकगीते, गोंधळ आणि अन्य पारंपरिक कलांचे सादरीकरणही या महोत्सवात होणार आहे. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध लोककलांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारण्यात आला आहे.
उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती पूनम चव्हाण, अन्वेषा आचरेकर, नगरसेविका नीना मुंबरकर, मेघा गावकर, चित्रा हरमलकर, अश्विनी कांदळगावकर, शरवरी पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, ललित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्या सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले, प्रणय तेली यांनी प्रास्ताविक केले, तर कोमल शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले.
स्थानिक लोककलांचे जतन व संवर्धन, कलाकारांना व्यापक व्यासपीठ आणि पर्यटनाला सांस्कृतिक जोड देण्याच्या दृष्टीने मालवणमधील हा बीच लोककला महोत्सव महत्त्वपूर्ण ठरत आहे.