तुरंबव शारदादेवी नवरात्रोत्सवासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
तुरंबव शारदादेवी नवरात्रोत्सवासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल; ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान एकेरी वाहतूक
अबीटगाव फाटा–तुरंबव रामवाडी मार्गे जाण्याची व्यवस्था; परतीसाठी निवळी हायस्कूलमार्गे वाहतूक
चिपळूण :
तालुक्यातील तुरंबव येथील प्रसिद्ध श्री शारदादेवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तात्पुरती एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत.
नवरात्रोत्सवादरम्यान श्री शारदादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक चारचाकी आणि दुचाकी वाहनांतून तुरंबव येथे येतात. परिसरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन वहाळ फाटा ते अबीटगाव या मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
असा असेल एकेरी वाहतुकीचा मार्ग
भाविकांना जाण्यासाठी अबीटगाव फाटा – तुरंबव रामवाडी – तुरंबव ग्रामपंचायत हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर परतीच्या प्रवासासाठी तुरंबव ग्रामपंचायत – निवळी हायस्कूल – तुरंबव फाटा या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
ही वाहतूक व्यवस्था रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
या वाहतूक निर्बंधांतून पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच शासकीय व मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी पोलिसांनी परवानगी दिलेल्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. आपत्कालीन किंवा निकडीच्या परिस्थितीत घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार असतील.
वाहतूक बदलाबाबत नागरिक, वाहनचालक किंवा वाहनमालकांना काही आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवावेत. प्राप्त आक्षेपांचा योग्य विचार केला जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.