पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य; धोकादायक ठिकाणी सूचना फलक, गर्दीच्या किनाऱ्यांवर पोलीस व होमगार्डची गस्त वाढविण्याचे निर्देश
रायगड :
जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी गस्त वाढवावी आणि बचाव यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश फलोत्पादन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले. त्यांनी जिल्ह्यातील सागरी किनारा सुरक्षा व व्यवस्थापनाचा आढावा घेत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला.
समुद्रकिनाऱ्यांवरील संभाव्य धोके लक्षात घेऊन धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावावेत, असे निर्देश त्यांनी दिले. पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस आणि होमगार्डची गस्त वाढविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
बचावकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी आपदा मित्रांना पोहण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करण्यासाठी सज्ज ठेवावे. तसेच समुद्रकिनाऱ्यांवर प्रशिक्षित जीवरक्षक आणि आवश्यक बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पर्यटन मित्रांची नियुक्ती आणि संबंधित उपाययोजनांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. पर्यटकांना सुरक्षित आणि सुखकर अनुभव मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन करण्यात आले.
सुरक्षित समुद्रकिनारे आणि सुरक्षित पर्यटनहे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावी गस्त आणि तत्पर बचाव यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.