किल्ले प्रतापगडावरील शिवप्रतापदिन शौर्य स्मारकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार

0
3
किल्ले प्रतापगडावरील शिवप्रतापदिन शौर्य स्मारकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार
किल्ले प्रतापगडावरील शिवप्रतापदिन शौर्य स्मारकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार

किल्ले प्रतापगडावरील शिवप्रतापदिन शौर्य स्मारकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार

वीर जिवाजी महाले यांच्या पुतळा उभारणीसह विकासकामांचा आढावा; ड्रोन शो, थ्रीडी चित्रफीत आणि एआय सादरीकरणावर भर

सातारा :
किल्ले प्रतापगड येथील शिवप्रतापदिन शौर्य स्मारक आणि वीर जिवाजी महाले यांच्या पुतळा उभारणीच्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघदूत शासकीय निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत प्रतापगडावरील स्मारक आणि संबंधित विकासकामांचा आढावा घेण्यात आला. स्मारकावरील मशाल, प्रकाशयोजना, ड्रोन शो, त्रिमितीय (थ्रीडी) चित्रफीत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण अशा विविध बाबींवर यावेळी चर्चा झाली.
आधुनिक तंत्रज्ञानातून इतिहासाचे प्रभावी सादरीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाशी संबंधित ऐतिहासिक प्रसंगांचे महत्त्व अधोरेखित करणारी दर्जेदार चित्रफीत तयार करावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या. तसेच स्मारकातील गॅलरीची आसनक्षमता वाढवून पर्यटकांसाठी माहितीपूर्ण आणि अनुभवात्मक सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला.
ड्रोन शो, आकर्षक प्रकाशयोजना आणि आधुनिक डिजिटल सादरीकरणाच्या माध्यमातून पर्यटकांना इतिहासाचा अनुभव घेता यावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
ऐतिहासिक वारशाचे जतन आणि विकासकामांचा दर्जा
ऐतिहासिक वारशाचे जतन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. या दोन्ही बाबींचा समन्वय साधून प्रतापगडावरील सर्व विकासकामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, उपसचिव संतोष रोकडे आणि पुणे विभागीय संचालक भरत लांघी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here