3 एप्रिलला बिजापूर (Bijapur) जोनागुडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये झालेल्या या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले होते. तर पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता.यामध्ये एक जवान नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला होता. नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांचं अपहरण केलं होतं. या जवानाला सोडवण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न सुरू होते.
अखेर आज या जवानाला शेकडो गावकऱ्यांसमोर नक्षलवाद्यांनी सुरक्षितरित्या सोडले.पद्मश्री धर्मपाल सैनी यांच्या उपस्थितीत कोणत्याही अटीशिवाय नक्षलवाद्यांनी जवानाला कोणतीही दुखापत न करता सोडून दिले. तिथून रवाना झाल्यानंतर जवान राकेश्वर CRPF कॅम्पमध्ये दाखल झाले. राकेश्वर सिंह मन्हास हे तब्बल 6 दिवस नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते. त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती.यामध्ये पद्मश्री धर्मपाल सैनी, गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया यांचा समावेश होता. तसेच यावेळी 7 पत्रकारांची टीमही उपस्थित होती.
शिवाय यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थिती होते. राकेश्वर सिंह मन्हास यांना सोडण्यात आले तेव्हा हे सर्वजण उपस्थित होते. राकेश्वर यांच्या सुटकेनंतर पत्नी मीनू यांना आनंद अनावर झाला. त्या म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस आहे. त्यांच्या परत येण्यावर मला पूर्ण विश्वास होता. मी देवाचे आभार मानते. तसेच, सरकारचेही आभार मानते. राकेश्वर यांची आई कुंती देवी म्हणाल्या की, माझ्या मुलाला सोडणाऱ्यांचे मी आभार मानते. देवाचेही आभार मानते.
जवानाच्या सुटकेसाठी दोन सदस्यीय मध्यस्थीसाठी 11 जणांचं पथक बस्तरमधील बीहड इथे गेलं होतं. नक्षलावाद्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर जवानाची सुटका करण्यात आली.सरकारकडून मध्यस्थींची नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत.पण हि मध्यस्थी कोणत्या मुद्द्यांची होती आणि नक्षलवाद्यांनी कोणते मुद्दे मान्य करून या जवानांची सुटका केली याबद्दल काही माहिती कळली नाही.