खासगी रुग्णालयांना सेवा व उपचारांचे दरपत्रक मराठी आणि इंग्रजीत प्रदर्शित करणे बंधनकारक
खासगी रुग्णालयांना सेवा व उपचारांचे दरपत्रक मराठी आणि इंग्रजीत प्रदर्शित करणे बंधनकारक
राज्यातील सर्व खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधांचे दरपत्रक रुग्णांना सहज दिसेल अशा ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना उपचारांच्या संभाव्य खर्चाची पूर्वकल्पना मिळून आर्थिक नियोजन करणे सोपे होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम, १९४९ अंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालये आणि अन्य वैद्यकीय आस्थापनांना महाराष्ट्र नर्सिंग होम नियमावली, २०२१ मधील अनुसूची तीनमध्ये नमूद केलेल्या सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करावे लागणार आहेत. क्लिनिकल आणि रुग्णालयीन सेवांचे दर दर्शनी भागात लावणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच ते रुग्णालयाच्या आवारातील महत्त्वाच्या, सहज नजरेस पडणाऱ्या आणि रुग्णांना सहज पोहोचता येतील अशा ठिकाणी लावावे लागेल. रुग्णालयाने दरांमध्ये कोणताही बदल केल्यास दरपत्रक तातडीने अद्ययावत करणेही आवश्यक असेल.
या निर्णयामुळे रुग्णांना उपचारांचे दर समजण्यास मदत होणार असून, वैद्यकीय सेवांमधील पारदर्शकता वाढण्यास हातभार लागण्याची अपेक्षा आहे.