बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश; दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीतून आधार
बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश; दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीतून आधार
मुंबई :
बेस्ट उपक्रमातील दिवंगत कर्मचारी कै. सुधीर फके यांच्या कुटुंबाला आणि अन्सारी कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. बेस्ट कामगार सेनेच्या पाठपुराव्यानंतर शुभम फके यांना बेस्टच्या लेखा विभागात कायमस्वरूपी तत्त्वावर नोकरी देण्यात आली, तर अन्सारी यांच्या पत्नीला देखील लेखा विभागात कामावर घेण्यात आले.
याच वर्षी मार्च महिन्यात कै. सुधीर फके यांचे पहाटे कामावर येत असताना अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार हरपला आणि कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. या कठीण प्रसंगी त्यांचे सुपुत्र शुभम फके यांनी बेस्ट कामगार सेनेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू करण्यात आला.
सुरुवातीला बेस्ट प्रशासनाकडून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. या चर्चेतून सकारात्मक मार्ग काढण्यात आला आणि शुभम फके यांना कायमस्वरूपी तत्त्वावर नोकरी मिळाली.
अन्सारी कुटुंबावरही अशाच प्रकारचे संकट ओढवले होते. शुभम फके यांच्या प्रकरणाचा संदर्भ घेऊन अन्सारी यांच्या पत्नीला देखील बेस्टच्या लेखा विभागात कामावर घेण्यात आले. या दोन्ही कुटुंबांना दिलासा मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव आणि महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांचे संबंधित प्रतिनिधींनी आभार मानले.
बेस्टचा कर्मचारी हा केवळ कर्मचारी नसून संपूर्ण कुटुंबाचा आधार असतो. अशा कर्मचाऱ्यावर किंवा त्याच्या कुटुंबावर संकट कोसळल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सामूहिक जबाबदारी आहे. योग्य पाठपुरावा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रशासनाशी सकारात्मक चर्चा यांच्या माध्यमातून संकटग्रस्त कुटुंबांना दिलासा देता येतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
बेस्ट समितीचा सदस्य म्हणून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांचे हक्क जपणे आणि त्यांच्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही देण्यात आली. कामगारांचे हित आणि त्यांच्या कुटुंबांचे कल्याण हीच खरी बांधिलकी असल्याचे नमूद करत कामगार एकजुटीचे आवाहन करण्यात आले.