गावतळे हायस्कूलचे नंदकुमार कालेकर सर जिल्हास्तरीय ‘विद्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित
गावतळे हायस्कूलचे नंदकुमार कालेकर सर जिल्हास्तरीय ‘विद्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित
शिक्षण, अध्यात्म आणि समाजप्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
दापोली : अरविंद मांडवकर
गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, अध्यात्म व वाङ्मयाचे अभ्यासक, कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. नंदकुमार लीलाधर कालेकर यांना जिल्हास्तरीय ‘विद्यारत्न’ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण, अध्यात्म आणि सामाजिक प्रबोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गावतळे हायस्कूलचे नंदकुमार कालेकर सर जिल्हास्तरीय ‘विद्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कालेकर सर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असताना कालेकर सर यांनी अध्यापनासोबतच अध्यात्म, विज्ञान, साहित्य आणि मूल्यशिक्षण यांचा समन्वय साधला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे, संस्कार, विवेक आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे, तसेच कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
ज्ञानासोबत संस्कारांची शिदोरी देणारे आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला दिशादर्शन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अध्यापनातील आत्मीयता, विषयांचा सखोल अभ्यास आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांमुळे ते विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत.
कालेकर सर यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या प्राचार्या भक्ती सावंत तसेच सर्व शिक्षकवृंदांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या सन्मानामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावतळे परिसरासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षणातून ज्ञान, अध्यात्मातून संस्कार आणि समाजप्रबोधनातून जनजागृती घडविणाऱ्या कालेकर सर यांचा हा सन्मान शिक्षकवर्गासाठी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या पुढील शैक्षणिक, आध्यात्मिक आणि सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!