प्राचार्या भक्ती सावंत, शिक्षक डी. जे. शिरसाठ, विद्यार्थी आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे तीन पिल्लांची सुटका
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली, गावतळे : आईपासून दूर झालेल्या रानटी बदकांच्या पिल्लांना घार आणि कावळ्यांपासून वाचविण्यासाठी श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गावतळे येथील शिक्षक, विद्यार्थी आणि वनविभागाने दाखविलेल्या तत्परतेमुळे तीन पिल्लांना जीवदान मिळाले. शाळेच्या क्रीडांगणावर घडलेल्या या घटनेतून वन्यजीवांप्रती संवेदनशीलता आणि निसर्गसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शाळेच्या क्रीडांगणात आईपासून दूर झालेली रानटी बदकांची सहा लहान पिल्ले सैरावैरा धावत असल्याचे प्राचार्या भक्ती सावंत यांच्या निदर्शनास आले. या पिल्लांना पकडण्यासाठी घार आणि कावळे आकाशात घिरट्या घालत होते. त्यामुळे पिल्लांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत गावतळे गावातील ग्रामस्थ उत्तम पवार हे पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते.
पिल्लांची गंभीर अवस्था लक्षात घेऊन प्राचार्या भक्ती सावंत यांनी तातडीने शाळेतील शिक्षक तथा राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख डी. जे. शिरसाठ यांना विद्यार्थ्यांच्या मदतीने पिल्लांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या. शिरसाठ सरांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अथक प्रयत्न करत तीन पिल्लांना सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर या घटनेची माहिती दापोली येथील वनविभागाला देण्यात आली.
माहिती मिळताच वनरक्षक एस. डी. गुरव आणि व्ही. डी. झाडे यांनी शाळेला भेट दिली. त्यांनी सुरक्षितपणे पकडलेल्या रानटी बदकांच्या तीन पिल्लांना आपल्या ताब्यात घेतले.
वन्यजीव संरक्षणातून विद्यार्थ्यांसमोर आदर्श!
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शाळेने दाखविलेली तत्परता आणि विद्यार्थ्यांनी दिलेले सहकार्य कौतुकास्पद ठरले. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून निसर्गप्रेम, प्राणीमात्रांप्रती दया आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम या घटनेतून झाले. प्राचार्या भक्ती सावंत, शिक्षक डी. जे. शिरसाठ, सहकार्य करणारे विद्यार्थी, ग्रामस्थ उत्तम पवार आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे संकटात सापडलेल्या पिल्लांना सुरक्षितता मिळाली.
या घटनेमुळे गावतळे हायस्कूलमधील निसर्गसंवर्धनाच्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.