जलसंधारण लोकचळवळीला सिंधुदुर्ग पोलीस दलाचे बळ; डिंगणे आणि चिपी येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी
जलसंधारण लोकचळवळीला सिंधुदुर्ग पोलीस दलाचे बळ; डिंगणे आणि चिपी येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी
सिंधुदुर्ग :
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाने जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे-बांदा परिसर आणि चिपी वाडी येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवून पोलीस दलाने या उपक्रमात सहभाग घेतला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
डिंगणे-बांदा येथे पोलीस अधीक्षकांचे श्रमदान
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत डिंगणे, बांदा परिसरात वनराई बंधारा उभारण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः या कामात सहभागी होत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबत श्रमदान केले. पावसाचे पाणी अडवून त्याचा जमिनीत अधिकाधिक निचरा होण्यास मदत करणाऱ्या अशा स्थानिक उपाययोजनांचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
जलसंधारण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहभागातून यशस्वी होणारी सामूहिक चळवळ आहे, असा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
चिपी वाडी येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
याच मोहिमेअंतर्गत चिपी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिपी वाडी येथील ओढ्यावर वनराई बंधारा उभारण्यात आला. या कामात निवती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड यांनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चिपीचे पोलीस पाटील, आरोग्य पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसह ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले. विविध शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ एकत्र आल्याने या जलसंधारण मोहिमेला लोकसहभागाची जोड मिळाली.
आजचे श्रमदान, उद्याची जलसमृद्धी!
भूजलसाठ्याचे संवर्धन, पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांसारख्या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतात. नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या लोकचळवळीत सहभागी व्हावे, हा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
‘आजचे श्रमदान, उद्याची जलसमृद्धी!’ या भावनेतून सिंधुदुर्ग पोलीस दलाने जलसंधारणाच्या कामाला हातभार लावला. ‘कर्तव्य आमचे, सुरक्षा तुमची!’ हे ब्रीद जपत सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनासाठीही पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे.