पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या
सिंधुदुर्गात ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग :
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याखाली आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करून ड्रग्जमुक्त भारताचा संदेश देणारी ही रॅली राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला बळ देणारी ठरत आहे.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय एकता परेडमध्ये सहभागी होण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. अंमली पदार्थांच्या विळख्यापासून तरुण पिढीला दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक असून, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि एसएपी दीक्षित कुमार उपस्थित होते.
‘राष्ट्रीय एकात्मता दृढ करूया, ड्रग्जमुक्त भारत घडवूया,’ असा संदेश देत नितेश राणे यांनी या जनजागृती मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला.