महाडमध्ये पालकमंत्री महाआरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांची मोफत तपासणी

0
5
महाडमध्ये पालकमंत्री महाआरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांची मोफत तपासणी
महाडमध्ये पालकमंत्री महाआरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांची मोफत तपासणी

महाडमध्ये पालकमंत्री महाआरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांची मोफत तपासणी

महाड 
महाड येथील बुटाला सांस्कृतिक भवनात आयोजित ‘पालकमंत्री महाआरोग्य मेळाव्या’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी मेळाव्याला भेट देऊन रुग्ण, माता-भगिनी आणि डॉक्टरांशी संवाद साधला. या मेळाव्यात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, रक्ततपासणी, फिजिओथेरपी आणि औषधवाटप करण्यात आले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून, कृष्णा विश्व विद्यापीठ (कराड) यांच्या सहकार्याने तसेच शिवसेना महाड विधानसभा, युवासेना, महिला आघाडी आणि शेतकरी सेनेच्या सहभागातून या आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अस्थिरोग, त्वचारोग, नेत्ररोग, दंतवैद्यक, स्त्रीरोग, कान-नाक-घसा आणि शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच आयुष्मान भारत कार्ड आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत मार्गदर्शन करून आवश्यक शस्त्रक्रियांसाठी पुढील उपचारांची माहिती देण्यात आली.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष ‘आशा रोटरी एक्सप्रेस व्हॅन’द्वारे स्तनाचा आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार करणे शक्य होते. त्यामुळे महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गरजू रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र आरोग्य सेवकांची फळी
अनेकदा आर्थिक अडचणींबरोबरच शासकीय आरोग्य योजनांची पुरेशी माहिती नसल्यामुळे गरीब रुग्णांना उपचार मिळण्यात अडथळे येतात. हे टाळण्यासाठी मतदारसंघातील रुग्णांना मुंबई आणि पुणे येथील मोठ्या रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र ‘आरोग्य सेवकांची’ फळी उभी केल्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. खऱ्या गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेऊन मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
महाड ग्रामीण रुग्णालयात हजारो यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णांना दिलासा देणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंतनु डोईफोडे आणि पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भानुदास गिरी यांच्या कार्याचेही त्यांनी जाहीर कौतुक केले.
पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्याचे आश्वासन
सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीचा उल्लेख करताना नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. स्वतंत्र शासकीय तरतूद नसतानाही गावोगावी बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले असून, पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या मेळाव्यास महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, पंचायत समिती सभापती प्रेरणा सावंत, उपसभापती सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्या मनाली काळीजकर, गटविकास अधिकारी उदय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, कृष्णा हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, सागर पवार, पोलीस निरीक्षक नारायण एकशिंग, शिवसेना जिल्हा प्रवक्ते संजय मेहता, नितीन पावले, राजेश देशमुख, युवासेना तालुका अधिकारी पप्या अंबावले, सपना मालुसरे यांच्यासह महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांतील वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here