पाणी बचत आणि प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्या; नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
पाणी बचत आणि प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य द्या; नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई :
एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे हे महापालिकेपुढील महत्त्वाचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर विभागस्तरीय विशेष भरारी पथकांनी संपूर्ण क्षमतेने काम करून पाणी बचतीसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंते उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि तक्रार निवारणावर भर
नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, अशा पद्धतीने जलनियोजन करावे. पाण्याशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मदतकार्य यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. आगामी कालावधीतील पाणीपुरवठ्याचे सर्वसमावेशक नियोजन करून आराखडा तयार करावा आणि त्यासंदर्भात दोन दिवसांत विशेष बैठक आयोजित करावी, अशी सूचनाही त्यांनी पाणीपुरवठा विभागाला केली.
बांधकाम क्षेत्रे, सर्व्हिस सेंटर्स आणि कार वॉशिंग सेंटर्समध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर केला जात आहे की नाही, यावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
हवा प्रदूषणाबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण
नवी मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी सर्व बांधकाम स्थळांवर नियमित देखरेख ठेवावी. प्रदूषण नियंत्रणाच्या मानकांचे उल्लंघन आढळल्यास तातडीने कारवाई करावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रदूषणाच्या बाबतीत शून्य सहिष्णुतेचे धोरण अवलंबताना महानगरपालिकेच्या स्वतःच्या बांधकाम प्रकल्पांनाही समान कठोर नियम लागू करावेत, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्देशांनुसार सर्व बांधकाम स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत की नाही, याचीही खातरजमा करण्यास सांगण्यात आले.
दिवाळीत फटाक्यांवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी
हवा प्रदूषण कमी करण्यासाठी आगामी दिवाळीत आवाजी फटाक्यांवरील निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. फटाके विक्रेत्यांना निर्बंधांबाबत लेखी सूचना द्याव्यात आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. अग्निशमन विभागानेही या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गासारख्या प्रमुख रस्त्यांवर नियमितपणे डीप क्लीनिंग मोहीम राबवावी. रस्ते स्वच्छ करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, तसेच वर्दळीच्या चौकांमध्ये धूळ नियंत्रणासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे कारंजे उभारण्याच्या शक्यतेवर कार्यवाही करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.
नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश
बैठकीत लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत प्रलंबित कार्यवाही, तक्रार निवारण पोर्टलवर प्राप्त तक्रारी, शिष्यवृत्ती व अन्य योजनांची अंमलबजावणी तसेच आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळेत आणि तत्परतेने निराकरण करण्यासाठी सर्व विभागांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.