ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर ५० टक्के सवलत

0
12
ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर ५० टक्के सवलत
ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर ५० टक्के सवलत

ओबीसी महामंडळाच्या थकबाकीदारांना थकीत व्याजावर ५० टक्के सवलत

एकरकमी परतावा योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू; पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्त होण्याची संधी

सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित तसेच त्याच्या उपकंपनीअंतर्गत असलेल्या शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी कर्ज घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील थकबाकीदार लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (वन टाइम सेटलमेंट) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्जरकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.
महामंडळामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र ओबीसी लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुदत कर्ज योजना, बीज भांडवल कर्ज योजना, स्वर्णिमा कर्ज योजना आणि मार्जिन मनी कर्ज योजना आदी योजनांद्वारे कर्जवाटप करण्यात आले आहे. या योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या आणि थकबाकी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना संपूर्ण थकीत कर्जरकमेचा एकरकमी भरणा करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना थकीत व्याजाच्या रकमेवर ५० टक्के सवलत देण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील महामंडळाच्या सर्व थकबाकीदार लाभार्थ्यांनी निर्धारित मुदतीत कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी केले आहे.
योजनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा.
संपर्क तपशील :
– जिल्हा व्यवस्थापक : ८६६८८९८९५०
– दूरध्वनी : ०२३६२-२२८११९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here