रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क

0
123

रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यातील पूरस्थितीत मदतीसाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत सर्व तैनात असलेल्या यंत्रणा सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफच्या प्रत्येकी दोन अशी एकूण चार पथके रवाना होत आहेत. तर ठाणे येथे तीन व पालघर येथे एक टीम पोहचली आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तात्काळ मदतीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, कोयना धरणातून होणाऱ्‍या पाण्याचा विसर्ग व वशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व खेड या शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या भागातील मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम लवकरच पोहोचतील यासाठी आपत्ती व्यवस्थापन  विभाग प्रयत्नशील आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी कोस्टगार्ड व वायुदलाचीही मागणी केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झालेला आहे. तेथील जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे शाहुवाडी व गगनबावडा तालुक्यातील काही परिसर जलमय झालेला आहे. सिंधुदुर्गला गगनबावड्यामार्गे होणारी वाहतूक थांबवली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.या भागातही एनडीआरएफची दोन पथके मदतीसाठी रवाना झाली आहेत. ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण व भिंवडी  च्या काही परिसरात पाणी साचले आहे.या भागात मदतीसाठी एनडीआरएफची तीन पथके मदतीसाठी पोहचली आहेत. या भागातही पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे असे  श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

मुंबईत दोन एनडीआरएफच्या टीम असून एक टीम नागपूरमध्ये तर सात टीम पुणे येथे आहेत. जिल्ह्यामधील सर्व यंत्रणांकडून नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here