जैन समाजातील ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटींचे कर्जवितरण; तीन योजनांचा शुभारंभ
जैन समाजातील ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटींचे कर्जवितरण; तीन योजनांचा शुभारंभ
आशिष शेलार यांच्या हस्ते धनादेश प्रदान
मुंबई :
जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तीन महत्त्वपूर्ण कर्ज योजनांच्या पहिल्या टप्प्यात ५११ लाभार्थ्यांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. घाटकोपर येथील आराध्य भक्ती पार्क येथे आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना कर्जवितरणाचे धनादेश प्रदान करण्यात आले.
शेठ वालचंद हिराचंद स्वयंरोजगार कर्ज व्याज परतावा योजना, कर्मवीर भाऊराव पाटील उच्च शिक्षण कर्ज योजना आणि महिला बचत गट कर्ज योजना या तीन योजनांच्या माध्यमातून जैन समाजातील गरजू घटकांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. व्याजमुक्त कर्ज, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देऊन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जैन समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच प्राकृत, संस्कृत आणि मराठी साहित्याच्या देवाणघेवाणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जैन समाजाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने किमान १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून शासनाच्या मदतकार्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
जैन धर्माची परंपरा प्राचीन असून भारतीय संस्कृतीशी तिचे अतूट नाते आहे. व्यापक सांस्कृतिक एकात्मतेच्या भावनेतून समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे वाटचाल करणे आवश्यक असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, प्रमुख संयोजक पराग शाह, महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, जैन मुनी नम्र मुनी महाराज, साध्वी तसेच जैन समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.