केंद्राकडून महाराष्ट्राला ७,०२२ कोटींचा अतिरिक्त निधी; देशातील राज्यांना १.०९ लाख कोटींचे कर हस्तांतरण
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यांना कर हस्तांतरणाचा अतिरिक्त हप्ता जारी केला आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कर हस्तांतरणाअंतर्गत महाराष्ट्राला ७,०२२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. देशातील सर्व राज्यांना मिळून एकूण १,०९,०१९ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले आहे.
नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून देण्यात आलेला हा दुसरा अतिरिक्त हप्ता आहे. या निधीमुळे राज्य सरकारांना विकासकामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी अतिरिक्त आर्थिक बळ मिळणार आहे.
महाराष्ट्राला प्राप्त झालेल्या ७,०२२ कोटी रुपयांच्या निधीमुळे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प, विविध विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच भांडवली खर्च वाढविण्यासह राज्याच्या विकासात्मक प्राधान्यक्रमांनुसार निधीचे नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.