महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून आरोग्य संवाद यात्रा; १२५ नवीन आरोग्य संस्थांचे होणार लोकार्पण
महाराष्ट्रात १ नोव्हेंबरपासून आरोग्य संवाद यात्रा; १२५ नवीन आरोग्य संस्थांचे होणार लोकार्पण
नांदेड :
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथून या यात्रेला प्रारंभ होणार असून, ५ डिसेंबर २०२६ पर्यंत ही यात्रा राज्यभर सुरू राहणार आहे. या कालावधीत आरोग्यमंत्री थेट नागरिकांशी संवाद साधून सार्वजनिक आरोग्य सेवांचा आढावा घेणार आहेत. यात्रेदरम्यान राज्यातील १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
या यात्रेची सांगड ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाशी घालण्यात आली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, आजारांचे नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यात्रेदरम्यान नागरिक, लोकप्रतिनिधी, आरोग्य समित्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल. त्यांच्या सूचना, अनुभव आणि अडचणी जाणून घेऊन सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे नियोजन आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे, दोन ग्रामीण रुग्णालये तसेच विविध शासकीय व विशेष रुग्णालयांच्या कामकाजाची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य योजनांमध्ये सहभागी असलेल्या अंगीकृत रुग्णालयांनाही भेटी दिल्या जाणार आहेत. यावेळी लाभार्थी आणि रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव जाणून घेतला जाईल.
नागरिकांच्या सूचना आणि अनुभवांच्या आधारे आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करून त्या अधिक प्रभावी, दर्जेदार आणि सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्याचा या आरोग्य संवाद यात्रेचा मुख्य उद्देश आहे.