
वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते भूमिपूजन
गावच्या विकासाचा प्लॅन तयार करा; नागरिकांचे उत्पन्न वाधेल तोच गावाचा खऱ्या अर्थाने विकास – आमदार प्रमोद जठार
चिमुकल्याच्या निरागस स्वागताने आमदार प्रमोद जठार भारावले
संगमेश्वर :
वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रमोद जठार रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला वाशी गावातील अंगणवाडीतील एका चिमुकल्या बालकाने आमदार प्रमोद जठार यांचे निरागसपणे स्वागत केले. चिमुकल्याच्या या प्रेमळ स्वागताने आमदार जठार भारावून गेले. या प्रसंगाने उपस्थित ग्रामस्थांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
भूमिपूजनानंतर मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन केले. “भारतीय जनता पार्टी हा काम करणारा पक्ष आहे. गावातील नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल, याचा विचार करून गावच्या विकासाचा प्लॅन तयार करा. नागरिकांचे उत्पन्न वाढले तरच गावाचा खऱ्या अर्थाने विकास होईल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
ग्रामपंचायत कार्यालयाची नूतन इमारत गावाच्या प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, गावाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामांचे नियोजन करण्यावरही आमदार जठार यांनी भर दिला.
यावेळी गावातील ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमाला रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा परिषद गटनेते प्रमोद अधटराव, मंडल अध्यक्ष रुपेश कदम, तालुका सरचिटणीस सचिन बांडागडे, गावच्या प्रथम नागरिक तन्वी गानू, उपसरपंच रमन जाधव, बोरसूतचे माजी उपसरपंच चेतन खामकर, दत्ता नार्वेकर, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष सतीश पटेल यांच्यासह भाजप पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
नूतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या भूमिपूजनामुळे वाशी तर्फे संगमेश्वर गावाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.

