८.०८ कोटींच्या ग्रीन केन बांबू क्लस्टरचे आज भूमिपूजन
मुरुड :
रायगड जिल्ह्यातील बांबू उद्योगाला चालना देण्यासाठी ग्रीन केन बांबू क्लस्टरच्या सामूहिक सुविधा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिरगाव, ता. मुरुड येथे आयोजित करण्यात आले आहे.
राज्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ८.०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या केंद्राच्या माध्यमातून बांबू प्रक्रियेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि सामूहिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बांबू उत्पादनांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक बांबू कारागीर, लघुउद्योजक आणि नवउद्योजकांना आधुनिक प्रक्रिया सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
या प्रकल्पाचा लाभ सुमारे ३०० ते ४०० उद्योगघटकांना होणार असून, त्यातून ५ ते ६ हजार लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. बांबू आधारित उद्योगांना संघटित स्वरूप देण्यासह स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील बांबू कारागीर, उद्योजक तसेच या क्षेत्रात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांनी भूमिपूजन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.