‘मिशन रॅपिड’ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम
‘मिशन रॅपिड’ अंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम; ‘आपले सरकार’ पोर्टलच्या मूल्यांकनात दुहेरी यश
रत्नागिरी :
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्याच्या ऑक्टोबर २०२६ मधील मूल्यांकनात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘मिशन रॅपिड’ (Mission RAPID) अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या मूल्यांकनामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘Overall Top Performing Service’ आणि ‘Service with Highest Citizen Score’ या दोन्ही श्रेणींमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरविण्याच्या कामात रत्नागिरी पोलीस दलाने आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेल्या समन्वयपूर्ण कामगिरीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.
‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देताना सेवा देण्याचा वेग, पारदर्शकता आणि गुणवत्तेला विशेष महत्त्व आहे. या निकषांवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सदैव कटिबद्ध असून, या यशामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.