कलमठ ग्रामस्थांच्या माणुसकीच्या दिव्याने वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांसह महिला-पुरुषांची दिवाळी झाली गोड!
कलमठ ग्रामस्थांच्या माणुसकीच्या दिव्याने वृद्धाश्रमांतील ज्येष्ठांसह महिला-पुरुषांची दिवाळी झाली गोड!
दिविजा व संविता आश्रमाला दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तू आणि आर्थिक मदत सुपूर्द
कणकवली :
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम आणि आपुलकीची देवाणघेवाण. हाच सणाचा खरा अर्थ कृतीतून जपत कलमठ बाजारपेठेतील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. असलदे येथील दिविजा वृद्धाश्रम आणि पणदूर येथील संविता आश्रमातील ज्येष्ठ नागरिक, महिला व पुरुषांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येत दिवाळी फराळ आणि जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले. तसेच दोन्ही आश्रमांना आर्थिक मदतही देण्यात आली.
‘यंदाच्या दिवाळीत आपल्या घरातील फराळ, प्रेम आणि मायेचा गोडवा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांपर्यंत पोहोचवूया’ या भावनिक आवाहनाला कलमठ बाजारपेठेतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाजाप्रति संवेदनशील असलेल्या काही व्यक्तींनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हे आवाहन केले होते. त्यानुसार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने फराळ आणि जीवनावश्यक वस्तू जमा केल्या.
शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांच्या समन्वयातून संकलित केलेल्या वस्तूंचे दोन्ही आश्रमांमध्ये वितरण करण्यात आले. असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात वस्तू सुपूर्द केल्यानंतर आश्रमाचे व्यवस्थापक संजय शेटये यांनी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन आणि देखभाल कशा प्रकारे केली जाते, याची माहिती दिली. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासह हिंदू धर्मातील सण आणि उत्सवही आश्रमात साजरे केले जातात, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी दिलेल्या फराळ आणि जीवनावश्यक वस्तूंबद्दल त्यांनी आभार मानले.
पणदूर येथील संविता आश्रमातील निराधार व्यक्तींसाठी जमा करण्यात आलेला दिवाळी फराळ आणि जीवनावश्यक वस्तूही आश्रमाच्या व्यवस्थापक मंडळींकडे सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी कलमठचे ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, सूर्यकांत हुन्नरे, पत्रकार तुषार हजारे, नितीन ऊर्फ आबा मेस्त्री, भूषण ठाकूर, सिद्धेश घाडीगावकर, प्रसाद मठकर, निखिल हजारे, राहुल कडुलकर, राज सावंत, नील लोकरे, निश्चय हुन्नरे आदी उपस्थित होते.
फराळ संकलनासाठी प्रेरणा हजारे, राणी हजारे, भूषण ठाकूर, नितीन ऊर्फ आबा मेस्त्री, निश्चय हुन्नरे, शुभ्रा घाडीगावकर, स्वरा गावडे तसेच स्वामी समर्थ संघ, कलमठ यांनी विशेष मेहनत घेतली.
दिवाळी म्हणजे केवळ घराघरांत दिवे लावण्याचा सण नव्हे, तर आपल्या आनंदातील थोडासा वाटा गरजू आणि निराधार व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचा उत्सव आहे. कलमठ ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून माणुसकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा दीप प्रज्वलित करीत खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.