गोकुळच्या लढ्यातून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली – सतेज पाटील; संघर्ष मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोकुळच्या लढ्यातून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली – आमदार सतेज पाटील
संघर्ष मोर्चाला राज्यभरातून प्रतिसाद
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापूरच्या मातीत रुजली आहेत, असा दावा काँग्रेसचे आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी केला. लोकशाही आणि सहकार क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी तसेच गोकुळ दूध संघातील शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात काढण्यात आलेल्या कोल्हापूर संघर्ष मोर्चाला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळच्या लढ्यातून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची बीजे कोल्हापुरात रुजली – सतेज पाटील; संघर्ष मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
साडेपाच लाख दूध उत्पादकांचा कौल डावलून शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देत महायुती सरकारने मागील दाराने गोकुळ दूध संघावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. या निर्णयाविरोधात लोकशाही आणि सहकार चळवळ टिकवण्यासाठी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, शेतकरी, दूध उत्पादक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सतेज पाटील म्हणाले की, आपण संघर्ष केला तर जिंकू शकतो आणि आपल्या लढ्याला जनतेचे भक्कम पाठबळ मिळते, हा विश्वास या आंदोलनामुळे अधिक दृढ झाला आहे. न्यायासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य माणसाला गोकुळच्या लढ्याने नवी ऊर्जा आणि विश्वास दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची सुरुवात झाली असून, त्याची बीजे कोल्हापूरच्या भूमीत रुजली आहेत. यावेळी त्यांनी, “याचना नही अब रण होगा, रण ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा,” अशा शब्दांत संघर्षाची भूमिका व्यक्त केली.
या संघर्ष मोर्चाला खासदार शाहू महाराज छत्रपती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार जयंत पाटील, सत्यजित पाटील-सरुडकर, ऋतुराज पाटील, राजीव आवळे, जयंत आसगावकर, मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि विवेकानंद पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शेतकरी, दूध उत्पादक आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवला.