दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीस १० कोटींची मदत
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा पुढाकार; मुख्यमंत्री सहायता निधीस १० कोटींची मदत
मुंबई:
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस १० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि बाधित नागरिकांना मदत मिळावी, तसेच संकटाच्या काळात त्यांना आर्थिक आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून न्यास व्यवस्थापन समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी या अर्थसहाय्याचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. न्यासाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असलेले सदानंद सरवणकर आणि न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द केला.
यावेळी न्यासाच्या विश्वस्त मीना कांबळी, महेश मुदलियार, गोपाळ दळवी, जितेंद्र राऊत, मनीषा तुपे, सुदर्शन सांगळे तसेच न्यासाचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. या १० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत पोहोचविण्यास हातभार लागणार आहे.