१९८३ पासूनच्या जुन्या शिवसैनिकांचा कणकवलीत स्नेहमेळावा;माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी जागवल्या जुन्या आठवणी!

0
8
१९८३ पासूनच्या जुन्या शिवसैनिकांचा कणकवलीत स्नेहमेळावा
१९८३ पासूनच्या जुन्या शिवसैनिकांचा कणकवलीत स्नेहमेळावा

१९८३ पासूनच्या जुन्या शिवसैनिकांचा कणकवलीत स्नेहमेळावा;माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी जागवल्या जुन्या आठवणी!

कणकवली दि.१३.नोव्हेंबर (प्रतिनिधी)
सन १९८३ मध्ये भगवा सप्ताहाच्या निमित्ताने सुरू झालेला शिवसेनेचा प्रवास, १९९० पर्यंत अधिक व्यापक होत गेला. मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य प्रश्नांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तन-मन-धन अर्पण करत शिवसेनेचे काम करणाऱ्या जुन्या शिवसैनिकांचा स्नेहमेळावा कणकवली येथील हॉटेल सावली, हूबरठ येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला माजी आमदार परशुराम उपरकर आणि माजी आमदार राजन तेली यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कणकवली तालुक्यातील अनेक जुन्या शिवसैनिकांनी उपस्थित राहून जुन्या संघर्षमय आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्यात बोलताना माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की, १९८३ पासून कणकवली तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेचे काम केले. अनेकदा उपाशीपोटी राहून, एकमेकांना सहकार्य करत आणि कोणत्याही अपेक्षेविना संघटना वाढविण्यासाठी कार्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या काळातील शिवसैनिकांनी काम केले. खारेपाटणला ठेच लागली तर ओसरगावला त्याची जाणीव होणारे, एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे निष्ठावंत शिवसैनिक त्यावेळी होते. याच शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना वाढली आणि आम्हालाही राजकारणात नावारूपाला येण्याची संधी मिळाली. आज आम्ही आमदार पदापर्यंत पोहोचलो, त्यामागे या सर्व जुन्या शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना उपरकर म्हणाले की, आज अनेक जुने शिवसैनिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असले तरी त्यावेळचा आपला शिवसैनिक म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. त्यावेळी अनेकांच्या घरात राजकारणाचा कोणताही वारसा नव्हता. तरीही स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्यांनी गावागावात आपली ओळख निर्माण केली. अशा सर्व सहकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यापुढेही आपण असेच एकत्र भेटत राहू, विचारांची देवाणघेवाण करू आणि जुन्या सहकाऱ्यांची कामे माजी आमदार म्हणून सोडविण्याचा प्रयत्न करू. सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार उपरकर यांनी त्यांच्यासोबत काम केलेल्या आणि आज हयात नसलेल्या जुन्या शिवसैनिकांचीही आठवण काढली. खारेपाटणपासून नरडवेपर्यंतच्या अनेक सहकाऱ्यांची नावे घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या सर्वांनी शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीत दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असे सांगत त्यांनी उपस्थित जुन्या शिवसैनिकांचे आभार मानले.
माजी आमदार राजन तेली यांनीही आपल्या मनोगतात जुन्या शिवसैनिकांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, १९८३ ते १९९० या काळातील शिवसैनिक आज एकत्र आल्याने जुन्या दिवसांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या काळात शिवसेना हे नाव उच्चारणेदेखील अनेकदा धाडसाचे मानले जात होते. घरातून आणि समाजातून विरोध असतानाही शिवसैनिकांनी मोठ्या संघर्षातून संघटना उभी केली. त्यावेळी केलेल्या आंदोलनांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण कोकणात शिवसेनेचा विस्तार झाला.
१९८६ मधील नांदगाव येथील घटना तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा कापण्यात आल्याच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करत तेली यांनी त्या काळातील शिवसैनिकांच्या संघर्षाची आठवण करून दिली. वामनराव महाडिक आणि नारायण राणे यांच्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीला दिशा मिळाली. त्या काळात शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि सामान्य शिवसैनिकांनी गावोगावी संघटना वाढविण्यासाठी घेतलेले कष्ट महत्त्वाचे होते.
ते पुढे म्हणाले की, नंदू आरोलकर, परशुराम उपरकर, आपण स्वतः आणि पावसकर यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी त्या काळात संघटनेसाठी काम केले. त्यावेळी कोणाच्याही घरात राजकारणाचा वारसा नव्हता. सामान्य कुटुंबातील शिवसैनिकांनी स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर संघटना वाढवली. त्यांच्या सहकार्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची आणि विविध पदे भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सर्व शिवसैनिकांचे ऋण मान्य करणे आवश्यक आहे.
आज अनेक शिवसैनिक वयाची साठी ओलांडून पुढे गेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि वेळोवेळी अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करणे गरजेचे आहे. जुन्या सहकाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासनही राजन तेली यांनी दिले. ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी जुन्या मैत्रीचे आणि संघटनात्मक संघर्षाचे नाते आजही कायम असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले. जुन्या आठवणी, संघर्षाचे किस्से आणि सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत हा स्नेहमेळावा भावनिक वातावरणात संपन्न झाला.
यावळी अनिल हळदिवे,विठ्ठल देसाई, गुरु पावस्कर, सतीश कदम ,नंदू आरोलकर, संजय मालंडकर, राजू राणे, आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here