सडवेच्या ८२१ वर्षांच्या ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला महाअभिषेक सोहळा!

0
5
सडवेच्या ८२१ वर्षांच्या ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला महाअभिषेक सोहळा!
सडवेच्या ८२१ वर्षांच्या ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला महाअभिषेक सोहळा!

सडवेच्या ८२१ वर्षांच्या ऐतिहासिक श्री लक्ष्मीनारायण मंदिरात २१ नोव्हेंबरला महाअभिषेक सोहळा!

कार्तिकी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी; प्रवचन, सहस्रनाम जप, दीपोत्सव आणि तुळशीविवाहाचे आयोजन

दापोली : प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील सडवे येथील ८२१ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री लक्ष्मीनारायण (विष्णू) मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मूर्ती महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लक्ष्मीनारायण सेवा समिती (सडवे) यांच्या वतीने हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सडवे येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभले आहे. मंदिरातील श्री विष्णूच्या मूर्तीच्या अधिष्ठानावर कोरलेल्या शिलालेखाच्या देवनागरी अनुवादानुसार, शके ११२७ अर्थात इ.स. १२०५ मध्ये उत्तर कोकणचा राजा द्वितीय केशीराज यांचे मांडलिक जैत्रसामंत यांचे प्रधान देवगीनायक यांनी या मूर्तीची स्थापना केली होती. त्यामुळे या ऐतिहासिक मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला २०२६ मध्ये ८२१ वर्षे पूर्ण होत आहेत. धार्मिक श्रद्धेबरोबरच ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या या मंदिरातील महाअभिषेक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री लक्ष्मीनारायण मूर्तीची पूजा व अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी १० वाजता सहस्रनाम जप आणि ११ वाजता महाआरती होणार आहे. दुपारी १२ वाजता पुणे येथील प. पू. श्री दत्तात्रय शंकर आदावडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता श्री लक्ष्मीनारायण सेवा समितीचे सुस्वर भजन होईल. सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव व आरती, तर रात्री ७ वाजता पारंपरिक तुळशीविवाह सोहळा संपन्न होणार आहे.
८२१ वर्षांचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या मंदिरातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन या सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांना घडणार आहे. या मंगलमय सोहळ्यास भाविक, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री लक्ष्मीनारायणाचे दर्शन आणि तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री लक्ष्मीनारायण सेवा समिती (सडवे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here