रत्नागिरी जिल्ह्यात २९ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश लागू
रत्नागिरी जिल्ह्यात २९ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश लागू
मोर्चा, मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी बंधनकारक
रत्नागिरी :
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते २९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, आक्षेपार्ह भाषणे करणे, सार्वजनिक घोषणा देणे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी विनापरवाना एकत्र येण्यास मनाई राहणार आहे.
जिल्ह्यात आगामी काळात विविध धार्मिक सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्त एकादशी, २१ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आणि २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती साजरी होणार आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
जिल्ह्यातील खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड आणि देवरुख या औद्योगिक पट्ट्यांमध्ये विविध मागण्यांसाठी स्थानिकांकडून अचानक संप आणि आंदोलने पुकारली जात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. विशेषतः अलोरे-शिरगाव हद्दीतील साफयीस्ट कंपनी, खेडमधील कोकाकोला कंपनी आणि जयगडमधील प्रस्तावित वाटद-खंडाळा एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात स्थानिकांकडून आंदोलने होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम अद्याप पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील मिश्रवस्तीच्या गावांमध्ये वैयक्तिक कारणांवरून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या कृत्यांवर राहणार मनाई
प्रतिबंधात्मक आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या, दगड किंवा अन्य शस्त्रे बाळगणे, गोळा करणे अथवा तयार करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगण्यासही मनाई राहणार आहे.
सभ्यता, नीतिमत्ता किंवा सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचेल अशी भाषणे करणे, सोंग आणणे किंवा आक्षेपार्ह वस्तू अथवा मजकुराचा प्रसार करणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्रेताच्या प्रतिमांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे किंवा वाद्ये वाजविणे यांनाही मनाई असेल. याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी विनापरवाना एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना अपवाद
या आदेशातून अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्नसोहळे, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम आणि कर्तव्यावर असलेले शासकीय कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. तसेच सिनेमागृहे आणि रंगमंच यांसारख्या सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणांनाही हे आदेश लागू राहणार नाहीत.
दरम्यान, या कालावधीत कोणताही मोर्चा, मिरवणूक किंवा सभा आयोजित करायची असल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी अर्थात प्रांताधिकारी यांची पूर्वलेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.