दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू
आठवड्याचे सातही दिवस फ्लाय ९१ ची उड्डाणे
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हावासीयांची गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा असलेली चिपी-नवी मुंबई थेट विमानसेवा अखेर सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा सुरू झाली. फ्लाय ९१ (Fly91) या विमान कंपनीकडून ही सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिपी ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते चिपी हा प्रवास अवघ्या एक तास १० मिनिटांत पूर्ण होणार आहे. या विमानसेवेच्या पुनःशुभारंभामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दळणवळण क्षेत्रात महत्त्वाची भर पडली आहे.
चिपी विमानतळावर विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त उत्साहाचे वातावरण होते. मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे ढोल-ताशांच्या गजरात पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पास वितरित करण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. विमानसेवा सुरू झाल्यामुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असून, स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पर्यटकांची वाहतूक, पर्यटन व्यवसाय आणि त्यास पूरक विविध सेवा यांचा लाभ जिल्ह्यातील तरुणांनी घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्पन्नाच्या दृष्टीने राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चिपी विमानतळावरून विमानसेवा नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी धावपट्टी, विमानसेवेच्या वेळेची मर्यादा, रस्ते, जागेची उपलब्धता आणि रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा अशा विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करणे आवश्यक होते. गेल्या दोन वर्षांत या सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात आल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही चिपी विमानतळावरून सेवा सुरू करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लहान शहरांमधील विमानतळांवर विमानसेवा सातत्याने सुरू ठेवण्यासाठी शासनाचे आर्थिक पाठबळ महत्त्वाचे असते. यासाठी राज्य सरकारने विशेष प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडून त्यास मान्यता मिळविल्याचे सांगण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी ही विमानसेवा केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरू होत असल्याची माहिती दिली. या योजनेतून विमान तिकिटाच्या दरात सुमारे तीन हजार रुपयांचे अनुदान मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चिपी-नवी मुंबई विमानसेवा पुन्हा बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई यांच्यातील प्रवास अधिक जलद होणार असून, जिल्ह्यातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हावासीयांसाठी दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन पुन्हा उपलब्ध झाले आहे.