
महाराष्ट्रात निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांना सुरुवात; १८ नोव्हेंबरपासून आयोजन
संस्थास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत होणार स्पर्धा; विद्यार्थ्यांमध्ये सुजाण व जबाबदार मतदार संस्कृती रुजविण्याचा उद्देश
मुंबई / प्रतिनिधी :
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपासून संस्थास्तरीय फेरीला सुरुवात होणार असून डिसेंबरमध्ये जिल्हास्तरीय अंतिम फेरी पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करून भविष्यातील तसेच तरुण मतदारांमध्ये सुजाण आणि सहाभागात्मक मतदान संस्कृती विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील निवडणूक साक्षरता मंडळांमार्फत (Electoral Literacy Clubs – ELCs) निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धा संस्थास्तर, विधानसभा मतदारसंघ आणि जिल्हास्तर अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेची समज वाढविणे, लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
तीन टप्प्यांत होणार स्पर्धा
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संस्थास्तरीय फेरी १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या फेरीतून प्रत्येक शैक्षणिक संस्थेमधून निबंध व प्रश्नमंजुषा या दोन्ही स्पर्धांमधून एकूण दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
यानंतर ७ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत विधानसभा मतदारसंघस्तरीय फेरी होणार आहे. या फेरीतून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी होता येणार आहे. त्यानंतर १९ ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत निकाल जाहीर करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
| स्पर्धेचा टप्पा | कालावधी |
|---|---|
| संस्थास्तरीय फेरी | १८ ते २७ नोव्हेंबर २०२६ |
| विधानसभा मतदारसंघस्तरीय फेरी | ७ ते १२ डिसेंबर २०२६ |
| जिल्हास्तरीय अंतिम फेरी | १४ ते १८ डिसेंबर २०२६ |
| निकाल व प्रमाणपत्र वितरण | १९ ते २२ डिसेंबर २०२६ |

