सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क लागू

0
14
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क लागू
सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क लागू

सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क लागू

पर्यायी पाणीस्रोताचा आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; निवासी १०० तर व्यावसायिकांना २०० रुपये मासिक शुल्क
सिंधुदुर्गनगरीत पाणीटंचाईमुळे सकाळी व सायंकाळी पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय. पर्यायी पाणीस्रोताचा आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क लागू होणार.
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :
सिंधुदुर्गनगरी परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दररोजच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पर्यायी पाणीस्रोत निश्चित करून त्याचा सविस्तर आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत. याशिवाय येत्या १ डिसेंबरपासून सिंधुदुर्गनगरीत स्वच्छता शुल्क आकारण्यात येणार असून निवासी मालमत्तांसाठी १०० रुपये, तर वाणिज्य वापरासाठी २०० रुपये प्रतिमहिना शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीटंचाईच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सकाळी ७ ते ८.३०, सायंकाळी ६ ते ७ पाणीपुरवठा
सिंधुदुर्गनगरी परिसरात सध्या सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उपलब्ध पाणीसाठा आणि वाढती टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सकाळी ७ ते ९ या वेळेत होणारा पाणीपुरवठा आता सकाळी ७ ते ८.३० या वेळेत केला जाणार आहे. तर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होणारा पाणीपुरवठा एक तास केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी पाणीस्रोताचा आराखडा आठ दिवसांत
सिंधुदुर्गनगरीतील भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यायी पाणीस्रोतांचा शोध घेण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. यासाठी परिसरातील जवळच्या धरणसाठ्याचा पर्यायी पाणीस्रोत म्हणून विचार करण्यात येणार आहे. या स्रोताची उपलब्धता, पाणीपुरवठ्याची शक्यता आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. पुढील आठ दिवसांत होणाऱ्या बैठकीत हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गनगरीच्या विकासकामांचा आढावा
बैठकीत सिंधुदुर्गनगरीच्या नियोजित विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणी, शहर सुशोभीकरणाचा आराखडा, मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत कमान आणि व्यापारी संकुल उभारणी यासंदर्भात चर्चा झाली.
तसेच शहरातील अंतर्गत रस्ते, विद्युत व्यवस्था, सूचना फलक, गतिरोधक आणि दिशादर्शक फलक यांसारख्या मूलभूत सुविधांच्या नियोजनावर भर देण्यात आला. क्रीडा संकुल उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे आणि तेथे अपेक्षित सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.
१ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क आकारणी
सिंधुदुर्गनगरीतील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी १ डिसेंबर २०२६ पासून स्वच्छता शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये निवासी मालमत्तांसाठी प्रतिमहिना १०० रुपये, तर वाणिज्य वापराच्या मालमत्तांसाठी प्रतिमहिना २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी नुकतीच वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून कचरा संकलन आणि व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, तहसीलदार चैताली पवार यांच्यासह समितीचे सदस्य, आरोग्य, पाणीपुरवठा, जलसंपदा आणि नगर प्रशासन विभागांचे अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here