भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

0
12
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर
भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी आरोग्य शिबिर

मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि आयुष्मान भारत कार्डचे वाटप; शासकीय योजनांबाबतही मार्गदर्शन

वेंगुर्ला / प्रतिनिधी :
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहांतर्गत १७ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला कॅम्प येथे आदिवासी बांधवांसाठी विशेष आरोग्य शिबिर व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आदिवासी बांधव, महिला आणि बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, वेंगुर्ला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेणचे सहायक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे, नगरपंचायतीच्या आरोग्य सभापती गौरी माईणकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र लिलके, डॉ. सुप्रिया रावळ (आर.बी.एस.के.) आणि आयुष अधिकारी डॉ. संजीवनी लंबे आदी उपस्थित होते. याशिवाय आरोग्य सेविका, औषध निर्माता, आरोग्य मित्र, पी.एम.डब्ल्यू. आणि मदतनीसही सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचे महत्त्व विशद केले. आदिवासी समाजाच्या आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
आरोग्य शिबिरामध्ये वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधव, महिला आणि बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मोफत तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. तसेच दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आदिवासी कल्याणकारी योजनांची माहिती देऊन पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य शिबिराला वेंगुर्ला कॅम्प येथील आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here