विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘ज्ञानदीप’ संगणक कर्ज योजना
विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘ज्ञानदीप’ संगणक कर्ज योजना
आधुनिक संगणक व संगणकीय साहित्य खरेदीसाठी मिळणार आर्थिक सहाय्य; नजीकच्या बँक शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग :
शिक्षणातील प्रगती आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘ज्ञानदीप संगणक व संगणकीय साहित्य खरेदी कर्ज योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून संगणक आणि संगणकाशी संबंधित आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आजच्या डिजिटल युगात शिक्षण, व्यवसाय आणि विविध व्यावसायिक कामकाजासाठी संगणक व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता वाढत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी, तर व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी संगणक व संगणकीय साहित्य उपयुक्त ठरत आहे. ही गरज लक्षात घेऊन जिल्हा बँकेने ज्ञानदीप कर्ज योजना उपलब्ध केली आहे.
‘नव्या संधींची सुरुवात, डिजिटल साधनांच्या साथीने’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.