पालघर जिल्ह्यात ३ नवीन ग्राम न्यायालये स्थापन होणार; १५ पदांना शासनाची मंजुरी
पालघर जिल्ह्यात ३ नवीन ग्राम न्यायालये स्थापन होणार; १५ पदांना शासनाची मंजुरी
प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण १५ नियमित पदांना शासनाची मंजुरी
पालघर :
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावर न्यायव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड येथे प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन नवीन ग्राम न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी या तीन ग्राम न्यायालयांच्या स्थापनेस मान्यता दिली आहे.
या न्यायालयांच्या कामकाजासाठी शासनाने प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण १५ नियमित पदे मंजूर केली आहेत. यामध्ये प्रत्येक ग्राम न्यायालयासाठी एक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, एक लघुलेखक, एक वरिष्ठ लिपिक, एक कनिष्ठ लिपिक आणि एक बेलिफ कम शिपाई अशा पाच पदांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील तलासरी, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांमधील ग्रामीण नागरिकांना न्यायालयीन सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, स्थानिक पातळीवर न्यायप्रक्रिया अधिक सुलभ होण्यास हातभार लागणार आहे.