एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट झाल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून महानगरपालिकेच्या प्रत्येक जलक्षेत्रात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
पाणी उपलब्धतेचे नियोजन आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करता यावा, या उद्देशाने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जलक्षेत्रात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या निर्णयामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्याच्या खंडाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.